रवा-बेसन लाडू | Rava Besan Ladoo Recipe in Marathi2025
दिवाळीचा फराळ म्हटलं की गोड पदार्थांचा सुगंध घरभर दरवळतो ! आणि त्या गोड पदार्थांमध्ये रवा-बेसन लाडू ही एक क्लासिक रेसिपी आहे. हलके, मऊसूद, आणि तोंडात विरघळणारे हे लाडू बनवायला सोपे आणि खायला अप्रतिम लागतात.
आज आपण पाहणार आहोत पाक योग्य कसा करायचा आणि एक किलो मिश्रणातून परफेक्ट टुमटुमीत लाडू कसे तयार करायचे.


साहित्य (रवा-बेसन लाडू)
| घटक | प्रमाण |
|---|---|
| बारीक रवा | 2 कप |
| बेसन | 1 कप |
| साजूक तूप | ½ कप (पाव कप रवा भाजताना + पाव कप बेसन भाजताना) |
| साखर | 2 कप |
| पाणी | पाव कप |
| वेलची | 8 (पूड करून घ्यावी) |
| बदाम-पिस्ता, बेदाणे | सजावटीसाठी |
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
कृती (रवा-बेसन लाडू)
१. रवा भाजून घेणे
एका जाड बुडाच्या पॅनमध्ये सुरुवातीला पाव कप साजूक तूप आणि २ कप बारीक रवा घालून मध्यम आचेवर भाजा.रवा भाजताना तो सतत हलवत राहायचं कारण रवा हलवला नाहीतर रवा करपण्याची शक्यता असते आणि जर का रवा थोडाफार करपला तर लाडूची चव बिघडू शकते.रवा करपू नये याची काळजी घ्यायची.
रवा गुलाबीसर रंगाचा आणि खमंग सुवासिक झाला की तो एका प्लेटमध्ये काढून ठेवा.
२. वेलची पूड तयार करा
8 ते9 वेलची घेऊन बिया काढा आणि थोडी कुटून पूड करून घ्या. वेलची पूड करताना वेलची गरम तव्यावर थोड्याशा गरम करून घेतल्यानंतर वेलची पूड करताना ती छान बारीक होते.ही पूड लाडूंना मस्त सुगंध देते.
३. बेसनपीठ भाजणे
रवा भाजलेल्या पॅनमध्येच १ कप बेसन आणि पाव कप तूप घालून मध्यम आचेवर खमंग भाजा.
बेसन पीठ भाजताना देखील ते सतत खालीवर हलवत राहायचे आहे कारण बेसन पीठ करपू शकते आणि त्यामुळे मग लाडूची चव बिघडते . बेसनचा रंग बदामीसर झाला की गॅस बंद करा.
४. रवा आणि बेसन एकत्र करा
आता भाजलेला रवा आणि भाजलेले बेसन एका मोठ्या ताटामध्ये किंवा परातीमध्ये एकत्र करून चांगले हलवा. हे मिश्रण थंड होऊ द्या.
५. साखरेचा पाक तयार करा
एका मोठ्या पातेल्यात २ कप साखर आणि पाव कप पाणी घालून उकळवा.
पहिली उकळी आल्यावर मध्यम आचेवर ५ मिनिटं शिजवा.
एक ते दोन तारांचा हलका घट्ट पाक तयार करा — ना फार घट्ट ना फार सैल.
पाक कोमट झाल्यावरच पुढची प्रक्रिया करायची.
६. मिश्रण एकत्र करणे
रवा-बेसन मिश्रणात हा कोमट पाक ओता. सुरुवातीला हे मिश्रण सैल वाटेल, पण काही मिनिटांनी घट्ट होईल.
१० मिनिटांनी त्यात वेलची पूड मिसळा आणि छान एकजीव करून घ्या.
७. लाडू वळणे
मिश्रण थंड झाले की त्या मिश्रणाला तीन ते चार तास मुरून द्यायचे आणि मग नंतर लाडू वळायचे तुम्ही तुम्हाला पाहिजे त्या आकाराचे लाडू वळू शकता. लाडू वळताना तुमच्या आवडीनुसार प्रत्येक लाडूवर बदाम-पिस्त्याचे काप,बेदाणे लावून सजवा.
तयार झालेले लाडू मऊसूद, रवाळ आणि खमंग असतात.
उपयोगी टिप्स(रवा-बेसन लाडू)
-
जर मिश्रण खूप सुकं वाटलं, तर एक चमचा गरम पाणी घालून मऊ करा.
-
जर पाक जास्त घट्ट झाला असेल, तर थोडं पाणी घालून पुन्हा कोमट करा.
-
रवा सतत हलवत राहा, नाहीतर काही दाणे जळू शकतात.
-
बेसन जळू नये म्हणून सतत हालवत भाजा.
-
लाडू पूर्ण थंड झाल्यावर डब्यात भरा.
-
रवा आणि बेसन कधीही एकत्र भाजू नये.
अधिकृत माहितीसाठी येथे क्लिक करा
लाडूचे प्रकार
घरच्या घरी प्रेमाने केलेले लाडू हे फक्त गोड पदार्थ नसतात — ते आपल्या संस्कृतीचा आणि आत्मीयतेचा गोडवा जपतात. आज आपण रवा बेसन लाडू पाहिले तसेच बेसन न वापरता रवा खोबऱ्याचे लाडू बनविले जातात तसेच बेसन पिठाचा वापर करून फक्त बेसन पिठाचे , बुंदी पाडून बेसन पिठाचे, बेसन पिठाची शेव घालून कळीचे लाडू असे असंख्य प्रकार लाडूचे बनविले जातात..त्यातील काही प्रकार खालील प्रमाणे:
-
बेसन लाडू – भाजलेल्या बेसनात साजूक तूप, साखर आणि वेलची पूड घालून केलेले.
-
रव्याचे लाडू – रवा भाजून, साखरेचा पाक आणि तुपात मिक्स करून बनवलेले.
-
बुंदी लाडू – बेसनाच्या बुंदीला पाकात भिजवून वळवलेले.
-
तिळाचे लाडू – हिवाळ्यात बनवले जाणारे; तिळ व गुळ यांचा संगम.
-
नारळाचे लाडू – ताज्या नारळाचा कीस, साखर किंवा गुळ, आणि वेलची यांचा वापर.
-
डाळ लाडू – मूगडाळ, हरभरा डाळ, किंवा चणा डाळ भाजून केलेले पौष्टिक लाडू.
-
पोहे लाडू – झटपट गोड पदार्थ म्हणून प्रसिद्ध.
सर्वच लाडूचे प्रकार हे अप्रतिम बनतात चला तर मग भेटूयात आपण नवीन रेसिपी सोबत
पुन्हा भेटू या अशाच आणखी एका मस्त मराठी रेसिपीसोबत.तोपर्यंत तुम्ही देखील नवीन नवीन रेसिपीज करत राहा आणि आम्हाला देखील शेअर करा.मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा!